डी.के.ए.एस.सी. मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न

इचलकरंजी: लखन जाधव

दि. १७ येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज,इचलकरंजी मध्ये भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती’वाचन प्रेरणा दिन’उत्साहात संपन्न झाला.
महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलताना मा.प्राचार्य डॉ.अनिल पाटील म्हणाले,’भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम विज्ञानातील संशोधनाबरोबर अभिजात ग्रंथांचे वाचक होते.युवा पिढी वाचनाने व्यक्तिमत्त्व संपन्न होऊन भारताला महासत्ता बनवेल असे त्यांनी स्वप्न बाळगले.वाचनाने ज्ञान, मनोरंजन, माहिती बरोबरच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते.खऱ्या जीवनाचे आकलन होते म्हणून ग्रंथ आपले सोबती बनवले पाहिजेत.इंटरनेट, माध्यमातूनही वाचन घडते पण पुस्तकांचा प्रत्यक्ष सहवास व त्यातून मिळालेली अनुभूती वेगळीच असते ‘.
या समारंभाची सुरुवात प्रतिमा पूजन , दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने झाले. समारंभाच्या प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या समृद्ध ग्रंथालयातील विविध विभागांची ग्रंथसंपदा, नियतकालिके विद्यार्थीकेंद्री  उपक्रम इ.बाबतची माहिती ग्रंथपाल प्रा.विजय यादव यांनी सांगितली.कार्यक्रमात उपस्थितांनी सामूहिक मूकवाचनातून ग्रंथांचा आनंद घेतला.यावेळी अक्षरधारा प्रकाशनाचे श्री.दादासाहेब जगदाळे आणि मराठी अभ्यासक डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी महाविद्यालयाला ग्रंथभेट दिली.समारंभात  महाविद्यालयाच्या दुपार सत्राचे प्रमुख प्रा. डॉ.डी.ए.यादव,प्रा.डॉ.व्ही.पी.पाटील,प्रा.डॉ.डी.जी.घोडके, मेजर मोहन विरकर यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आकाश सस्ते,सानिका शेट्टी, प्रियांका भाटले , संजीवनी कदम,हिना बागवान यांनी वाचनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली.सदर प्रसंगी मांडण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचा प्राध्यापक व  विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. सदर समारंभास महाविद्यालयातील विविध विभागांतील प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.संजय सुतार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.भारती कोळेकर यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.