हुपरी, दि. २७:वार्ताहर
राज्यातच नव्हे तर देशात सहकारातील आदर्श असलेल्या जवाहर साखर कारखान्याचा “कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी – यळगूड” असा नामविस्तार करण्याचा निर्णय सोमवारी कारखाना कार्यस्थळी झालेल्या ३२ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयाचे सभेसाठी ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्वच सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने सोशल डिस्टन्सींगचे पालन करत पार पडली.
प्रारंभी कारखान्याच्यावतीने विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कारखान्याच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले, कोरोना महामारीमुळे सभा ऑनलाईन घ्यावी लागत आहे. निर्बंधामुळे कारखान्याने केलेले काम सभासदांसमोर खुलेपणाने मांडता येत नाही. पण जवाहरने आजवर शेतकरी सभासदांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले आहे. येणाऱ्या संकटावर मात करत जवाहरने देशात आदर्श निर्माण केला आहे. मागील २८ वर्षात जवाहरच्या प्रगतीचा आलेख नेहमी चढता ठेवला. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठबळ दिले आहे. उत्पन्न वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले आहे ते पुढेही अविरतपणे चालू राहील असे सांगितले. वार्षिक सभेच्या नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी केले. त्यानुसार विषयांना सभासदांनी मंजूरी दिली.
कारखान्याचे संचालक व आमदार प्रकाश आवाडे यांनी जवाहर कारखाना हा सहकारातील माईलस्टोन ठरला आहे. देशातील सहकारातील सर्वात मोठा कारखाना असून वेगाने प्रगतीची घोडदौड सुरु आहे. त्यामध्ये सभासदांचा मोलाचा वाटा आहे. सभासदांची आर्थिक उन्नती हेच कारखान्याचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना हवे ते देणारा जवाहर हा एकमात्र कारखाना आहे. मागील चार वर्षात दोन महापूर आणि दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे संकट ओढवत आहे. परंतु आव्हाने पेलत आणि संकटावर मात करत वाटचाल सुरु ठेवायची आहे. जवाहरने सर्वांना समजून घेऊन अडचणीच्या काळात जे जे हवे ते ते उपलब्ध करून दिले आहे. “ज्याचा नाही कोणी त्याच्यासाठी जवाहर” हे लक्षात घ्यावे. आजवर जवाहरने उच्चांकी गाळपाची परंपरा कायम राखली असून यंदाही ती कायम राहील असा विश्वास व्यक्त करत येत्या हंगामासाठी आजवर २४ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली असून गळीत हंगामासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शासन निर्णयानुसार शेअर्सची दर्शनी किंमत १० हजार रूपयावरून १५ हजार रूपये केले असल्याचे सांगितले. त्यासही सभासदांनी मंजूरी दिली. आभार कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासो चौगुले यांनी मानले. सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले. सभेस कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, केन कमिटी चेअरमन डॉ. राहूल आवाडे, संचालक सर्वश्री विलासराव गाताडे, आदगोंडा पाटील, सुकुमार किणींगे, अभयकुमार काश्मिरे, दादासो सांगावे, सूरज बेडगे, शितल आमण्णावर, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे, सुमेरु पाटील, जिनगोंडा पाटील, सौ.कमल पाटील, सौ.वंदना कुंभोजे, आण्णासो गोटखिंडे तसेच इचलकरंजीचे प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, स्वप्निल आवाडे, अनिल कुडचे, सुनिल पाटील, सर्जेराव पाटील, एम.के.कांबळे आदि उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.