पाटपन्हाळे हायस्कूलच्या 1979 च्या दहावी बॅचचे गेट-टुगेदर: 45 वर्षांनी शालेय मित्रांचा भावनिक मिलन

 

गुहागर: दिलीप जाधव 

पाटपन्हाळे हायस्कूलच्या 1979 च्या दहावी बॅचचे गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात साजरे झाले. तब्बल 45 वर्षांनी शाळेतील मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे आयोजन मित्रत्वाचे बंध अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शाळेतील आणि वर्गातील हयात नसलेल्या मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांना श्रद्धांजली वाहून त्यांचे स्मरण करण्यात आले. या भावनिक क्षणांनी सर्व उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले.

यानंतर वर्ग शिक्षक परचुरे सर यांना भेटण्यासाठी गुहागर येथील त्यांच्या निवासस्थानी सर्व उपस्थित गेले. त्यांनी सर्व मित्र-मैत्रिणींना आशीर्वाद देत मोलाचा सल्ला दिला, “तुमच्या वर्गातील कुणीही गरजू असेल तर त्याला आपला मित्र समजून सहकार्य करा. अशा मदतीतून मिळणारे पुण्य तुमच्या जीवनाला समृद्ध करेल.”

शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर, मित्रमंडळींनी अंजनवेल येथील सुप्रसिद्ध लाईट हाऊस आणि ऐतिहासिक शिवकालीन गोपाळगड किल्ला पाहिला. त्यानंतर अंजनवेलमधील सुप्रसिद्ध सीप्लेस रिसॉर्टमध्ये स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत गप्पांची मैफल रंगवली. यावेळी शाळा सोडल्यानंतरच्या प्रवासाबाबत सर्वांनी आपापले अनुभव आणि जीवनकथा सांगितल्या.

कार्यक्रमाचा शेवट गोड क्षणांनी झाला. 45 वर्षांनी एकत्र आलेल्या या खास मिलनासाठी केक कापण्यात आला. गेट-टुगेदरच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मित्र-मैत्रिणींनी एकमेकांचे आभार मानले. हा दिवस खऱ्या अर्थाने आनंदाने भरलेला ठरला आणि सर्वांच्या मनात कायम स्मरणात राहील, असे मत प्रत्येकाने व्यक्त केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.