क 1 शेरा काढण्यासाठी सत्वर कार्यवाही करावी

सहाय्यक संचालक वि. प. झगडे

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि. ०४ ऑगस्ट २०२५ : इचलकरंजी शहरातील मालमत्ता धारकांच्या प्रॉपर्टी कार्ड वर क १ शेरा आहे, तो काढण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने मोजणी करून नकाशे तयार केले. या सर्व नकाशावर भुकरमापक कोगेकर यांच्या सह्या आहेत तरी देखील नकाशे अधिप्रमाणित करण्यास इचलकरंजी नगर भुमापन अधिकारी शशिकांत पाटील यांनी नकार दिल्यामुळे क १ शेरा काढण्याचा प्रश्न २०१९ पासून प्रलंबित आहे याबाबत भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत तक्रार दाखल केली होती याची दखल घेऊन वि. प. झगडे सहाय्यक संचालक नगररचना कोल्हापूर शाखा यांनी आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका, सहाय्यक संचालक नगररचना योजना १ व २, नगर भुमापन अधिकारी इचलकरंजी यांना सत्वर कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

           राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या १०० दिवस कृती कार्यक्रम या उपक्रमाच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान उपक्रम सुरू केला आहे या अनुषंगाने नगर रचना विभाग विषयी तक्रारी अडचणी, सूचना व समस्याचे निवारण करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आवाहन केले होते. यानुसार भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी दि. १६  जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती.

          इचलकरंजी शहरातील मालमत्ता धारकांच्या अस्तित्वात विकास बाबत वस्तुनिष्ठ मोजणी व मालकी निश्चित करण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करणेस मान्यता दिली होती परंतु भूमापन अधीक्षक यांनी मनुष्यबळ अभावी या मोजणी करता येणार नाही असा अहवाल दिला होता त्यामुळे तत्कालीन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्याकडे बैठक लावून खाजगी एजन्सी सारथी इंजिनियर्स पुणे यांच्याकडून प्रत्यक्ष जागेवर वस्तुनिष्ठ मोजणी करून ४५ अभिलेख तयार करून भूमापन कार्यालय कडे अधिप्रमाणित करणे कामी सादर केले आहेत. परंतु खाजगी एजन्सीने तयार केलेले नकाशे अधिप्रमाणित करता येणार नाही असे मत भूमापन विभागामार्फत व्यक्त करण्यात आले. विशेष या मोजणी वेळी व या सर्व नकाशावर भूकरमापक तानाजी कोगेकर यांच्या सह्या आहेत तरी देखील भूमापन अधिकारी स्वतः नकाशे अधीप्रमाणित करण्यास टाळा टाळ करीत आहेत.

        याबाबत योग्य मार्ग काढण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त, सहाय्यक संचालक नगररचना विभाग इचलकरंजी महानगरपालिका, सहाय्यक संचालक नगर रचना योजना क्र. ०१  व ०२ , इचलकरंजी. नगर भुमापन अधीकारी इचलकरंजी यांना लेखी पत्र काढून सूचना दिल्या असून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पालकमंत्री यांना देण्याचे आदेश सहाय्यक संचालक नगर रचना झगडे यांनी काढले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.