इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम

सलग तिसर्‍या वर्षी प्रथम क्रमांकासह पटकावली चांदीची गदा

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 
 दि .१२ :     दि ९  ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून चांदीची फिरती गदा जिंकली. डिग्रज बोट क्लबने दुसरा, कवठेसार युवा शक्ती बोट क्लबने तिसरा तर डिग्रजच्या जय मल्हार बोट क्लबने चौथा क्रमांक मिळवला.

स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिस वितरण करण्यात आले. पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यतीचे आयोजन मंडळ मागील ३५ वर्षांपासून करत असून यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील एकूण १० बोट क्लबनी सहभाग घेतला.शर्यतीचा शुभारंभ सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते झाला. नदीच्या पाण्याचा वेग, खेळाडूंचा जोश आणि चुरशीच्या स्पर्धेमुळे प्रेक्षकांनी दोन्ही काठावर तसेच पुलांवरून मोठी गर्दी करत जल्लोष केला.

 प्रथम क्रमांकासाठीची चांदीची गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी प्रायोजित केली होती.

या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, तसेच उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते व श्रीरंग खवरे, पै. अमृत भोसले, अनिल कुडचे, शेखर शहा, राजू पुजारी  उपाध्यक्ष नंदु पाटील, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, शिवाजी काळे, तानाजी कोकितकर, सागर गळदगे, शिवाजी माळी, सागर मगदूम, डॉ. विजय माळी, श्रीकांत कगुडे, बजरंग कुंभार, राजू दरिबे, सागर कम्मे, गणेश बरगाले, इरफान अत्तार, वसीम बागवान, शशिकांत नेजे आदींसह मान्यवर व शर्यत शौकिन उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.