स्पर्धा परीक्षेची तयारी व्यक्तिमत्व घडवणारी – उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा

इचलकरंजी :विजय मकोटे 


दि.३: स्पर्धा परीक्षेची तयारी ही केवळ पद मिळवण्यासाठी नसून ती विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवते. प्रचंड संघर्षातून मिळवलेले पद आर्थिक स्थैर्य तर देतेच, पण काम करताना अतुलनीय समाधानही देते. प्रामाणिक व सातत्यपूर्ण कष्ट केल्यास स्पर्धा परीक्षेत निर्विवाद यश मिळवता येते. मात्र, अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण स्पर्धा परीक्षा का देत आहोत या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर स्वतःकडून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मिरज शहर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. प्रणिल गिल्डा यांनी केले.

श्री. ए. आर. तांबे सर संचलित श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेस यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.

यावेळी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. विशाल पाटील (कर सहाय्यक, विक्रीकर विभाग, कोल्हापूर) यांनी सांगितले की, निर्णयावर ठाम विश्वास, ध्येयावरील अतूट श्रद्धा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शक यांचा संगम झाला तर यश निश्चित मिळते. श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेस हे प्रभावी मार्गदर्शन केंद्र म्हणून पुढील काळात हजारो कर्तव्यदक्ष अधिकारी घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे सर यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात अचूक व परीक्षाभिमुख मार्गदर्शन देण्यासाठी इचलकरंजीत अत्यंत सूत्रबद्ध अभ्यासक्रम उभा करण्यात आला आहे. सर्व विषयांच्या सविस्तर नोट्स, डिजिटल क्लासरूम, साप्ताहिक चाचण्या, शिस्तबद्ध श्रद्धा लायब्ररी, चालू घडामोडींची बुकलेट्स आणि स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र प्रशस्त कॅम्पसच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अधिकारी घडवण्याचे स्वप्न संस्था साकार करत आहे.

या कार्यक्रमास संस्थेच्या व्यवस्थापकीय सदस्या सौ. सुप्रिया कौंदाडे, सौ. संगीता पवार, श्री. अभिषेक तांबे, सौ. सृष्टी तांबे, संस्थेतील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवृंद तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.