जय हनुमान मित्र मंडळ हेदलीतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

खेड: नियाज खान
दि.३: महापुरुषांच्या जयंती या नारळ-फुलांपुरत्या मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचे आचरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर यांनी केले.
        या वेळी जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप गोवळकर, प्राथमिक शिक्षक डोळस सर, रेणुका मुंडे, जाखडीचे शाहीर सदानंद शिगवण, संतोष घाणेकर, सोनू झुजम, वामन चिनकटे, सुरेखा गोवळकर, यशवंत गोवळकर  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हेदली गाव हे पुरोगामी आणि विवेकवादी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि अज्ञानाला नकार देत महापुरुषांच्या विचारांवर चालणाऱ्या या गावाने सातत्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवली आहे.यावेळी  मार्गदर्शन करताना  सचिन गोवळकर म्हणाले की,  समाजाने  महापुरुषांचे विचार घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे.  सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे स्त्री शिक्षण, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जयंती आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्याच्या वेशात सादर केलेले दृश्य पाहून आपण भारावून गेल्याचेही त्यांनी सांगितले. वैचारिक सावित्रीबाई फुले जयंती उत्सव प्रत्येक गावात झाला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष संदिप गोवळकर म्हणाले की, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी शिक्षणाद्वारे गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या. त्यामुळेच आज स्त्रिया राष्ट्रपती, पंतप्रधान, जिल्हाधिकारी यांसारख्या पदांवर पोहोचल्या आहेत. मात्र केवळ पदे मिळवून थांबणे पुरेसे नाही; अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे हीच सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची जंयती ठरेल. यावेळी प्राथमिक शिक्षिका रेणुका मुंडे  म्हणाल्या की, आज आम्ही स्त्रिया शिकू शकतो, बोलू शकतो, नोकरी करू शकतो याचे मूळ सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षात आहे. त्यांनी शाळा उघडल्या नसत्या तर स्त्री आजही अज्ञानाच्या अंधारातच अडकली असती.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाहीर सदानंद शिगवण यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.