यंत्रमाग वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१३ :यंत्रमाग उद्योगासाठी लागू असलेल्या वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत सहा महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग आयुक्त मा. संजय दैने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहआयुक्त गणेश वंडकर व प्रादेशिक उपायुक्त सौ. उज्वला पळसकर उपस्थित होत्या.
महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी यंत्रमाग उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची केली होती. या प्रक्रियेसाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी आणि जाचक अटींमुळे अनेक यंत्रमागधारकांना नोंदणी पूर्ण करणे शक्य झाले नाही.या पार्श्वभूमीवर असोसिएशनने आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांच्याकडे अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंत्रालयात तीन बैठका घेण्यात आल्या आणि ७ एप्रिल २०२६ रोजी सुधारित व सोपा ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला.
तथापि, इचलकरंजीत सुमारे १०,८०० यंत्रमागधारक असून, उर्वरित अवघ्या १५ दिवसांत सर्वांची नोंदणी पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे नोंदणीस सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पोर्टलवर नोंदणी करून यु.आय.डी. क्रमांक मिळवलेल्या यंत्रमागधारकांची वीज सवलत अंतिम मंजुरीअभावी बंद करू नये, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, सोमाण्णा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, दत्तात्रय टेके, किरण पोवार, राजाराम गिरी आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.