जवाहर कारखान्यास नॅशनल फेडरेशनकडून सर्वाधिक साखर निर्यात आणि ऊस गाळप पुरस्कार प्रदान
हुपरी:प्रतिनिधी
दि16 नोव्हेंबर -नशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् नवीदिल्ली या देश-विदेशातील साखर उद्योगाकरीता सल्ला, संशोधन व मार्गदर्शन करणार्या संस्थेकडून जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सन 2019-20 या 27 व्या हंगामात देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा तसेच सन 2020-21 या 28 व्या हंगामात देशातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये उच्च उतारा विभागामध्ये सर्वाधिक ऊसाचे गाळप केल्याबद्दल ‘सर्वाधिक ऊस गाळप’ पुरस्कार केंद्रीय सहकार व उत्तर पूर्व विभाग विकास राज्यमंत्री नामदार बी. एल. वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषि मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार होते.
कारखान्याचे संचालक आमदार प्रकाशआण्णा आवाडे, व्हा.चेअरमन बाबासो चौगुले, केन ’कमिटी चेअरमन डॉ. राहूल आवाडे आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी हा पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमास नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, फेडरेशनचे सर्व संचालक, तसेच साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.
ऊस गाळप हंगाम कालावधीत देशातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा, तांत्रिक कार्यक्षमता, ऊस विकास योजनेची कार्यवाही, साखर निर्यात याबाबत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रत्येक हंगामासाठी कारखान्यांना नॅशनल फेडरेशनकडून अशा पुरस्कारांनी गौरविण्यात येते. जवाहर कारखान्याने सन 2019-20 या 27 व्या हंगामामध्ये देशातून सर्वाधिक म्हणजे 7 लाख 7 हजार 280 क्विंटल साखर निर्यात केली आहे. तसेच सन 2020-21 या 28 व्या हंगामात उच्च साखर उतारा विभागामध्ये 163 दिवसात 18 लाख 88 हजार 129 मे.टन इतके ऊस गाळप करून 22 लाख 94 हजार 100 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या उद्दिष्टपूर्तीमुळेच 2020-21 या हंगामात जवाहर हा देशातील सहकारी साखर कारखानदारीमध्ये आणि कारखान्याच्या इतिहासात सर्वाधिक ऊस गाळप करणारा कारखाना ठरला आहे.
जवाहर कारखान्यास यापूर्वी साखर संघ मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, महाराष्ट्र ऊर्जा विकास .अभिकरण (मेडा) पुणे या राज्यपातळीवरील संस्थांकडून तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप.शुगर फॅक्टरीज् लि., नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेकडून प्रभावी ऊस विकास, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, योग्य आर्थिक व्यवस्थापन, ऊर्जा बचत, सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना, पर्यावरण व्यवस्थापन अशा पुरस्कारांनी गौरविलेले आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कारखान्यावर सभासद शेतकर्यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र असल्याचे या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे. त्यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद-शेतकरी, ऊस तोडणी मजूर-वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी-कर्मचारीकामगार या सर्वांचे अभिनंदन कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांनी केले आहे.
जवाहर साखर कारखान्याने शेतकर्यांसाठी पहिल्या हंगामापासून विविध ऊस विकास योजना, वैद्यकीय अर्थसहाय्य योजना राबविल्या आहेत. तसेच कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यरत आहेत. या पुरस्कारामुळे कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.