उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकावर महापालिकेची कारवाई; ५०० रुपयांचा दंड

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.१४: इचलकरंजी महानगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार तसेच उपायुक्त विद्या कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात घनकचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला तसेच उघड्या जागांमध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिक व व्यावसायिक आस्थापनांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

          दरम्यान, महापौर उदय धातुंडे यांना शहरातील एका नागरिकाने उघड्यावर कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीकडून नियमानुसार दंड वसूल करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले.यानुसार घनकचरा व्यवस्थापन प्रमुख धनंजय पळसुले यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, स्वच्छता निरीक्षक जयदीप शिंदे, मुकादम सुरेश सोनवले व प्रकाश माने यांनी कारवाई करत राकेश इंगवले (रा. सुतार मळा, इचलकरंजी) यांच्याकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

शहर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेकडे सुपूर्द करावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितले की, शहरातील स्वच्छता राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांनी स्वच्छतेबाबत आपली जबाबदारी ओळखून महापालिकेला सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असून शहर अधिक स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.