व्याजाच्या कर्जाच्या मोबदल्यात महिलेचा लैंगिक शोषणासाठी वापर; तिघांवर गुन्हा

इचलकरंजी,: सलीम मुल्ला 
दि.१४: व्याजाच्या पैशासाठी एका महिलेचा कथितरित्या गैरफायदा घेत तिला देहव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचा अपघात झाल्यानंतर आर्थिक अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी तिने एका महिलेकडून ७ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र ठरलेल्या वेळेत रक्कम परत न केल्याने आरोपींकडून तिच्याकडे वारंवार व्याजाच्या पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार, कर्ज व व्याजाची परतफेड न झाल्याचे कारण पुढे करून आरोपींनी संबंधित महिलेला त्यांच्या ताब्यातील ठिकाणी काम करण्यास भाग पाडले. त्यानंतर मुख्य आरोपी सर्जेराव कुंभार आणि संबंधित महिलेने संगनमताने तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यातून मिळणारे पैसे स्वतः घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय विनायक पवार याने ग्राहक उपलब्ध करून देण्याची भूमिका बजावल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.