जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांना ‘महाराष्ट्र कामगार भूषण’ पुरस्कार जाहीर

इचलकरंजी: विजय मकोटे 
 दि .१८: राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे देण्यात येणारा कामगार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा व संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिवर्षी फक्त एकमात्र दिला जाणारा सन २०२६ सालचा ‘महाराष्ट्र कामगार भूषण‘ पुरस्कार हुपरी येथील जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव अरविंद हळदकर  यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या वतीने जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल हळदकर यांचे अभिनंदन होत आहे.
सन १९९३ साली जवाहर साखर कारखान्यात टर्नर पदावर रुजू झालेल्या सर्जेराव हळदकर यांनी कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने भरीव काम केले आहे. सध्या ते जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्हा साखर कामगार समन्वय समितीचे कार्याध्यक्ष आहेत. सन 2008 साली राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना मिळाला होता. केंद्रीय कामगार शिक्षण मंडळावर पुणे विभागीय प्रादेशिक सल्लागार म्हणून ते सध्या काम पाहतात. गेली २५ वर्षे कामगारांना शिक्षण देण्याचे काम कामगार शिक्षण वर्गाच्या माध्यमातून ते करत आहेत तर कामगार कल्याण मंडळाच्या सर्व योजना कामगारांपर्यंत पोहचवण्यात अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
लवकरच महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई येथे संपन्न होणार आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, तसेच कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचे श्री. हळदकर यांना सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.