कडवई-तुरळ रस्त्याच्या निकृष्ठ कामाची गृपग्रामपंचायत कडवई ग्रामसभेत दखल

संगमेश्वर/
संगमेश्वर तालुक्यातील कडवई ते तुरळ हा सन २०२० साली बनवण्यात आलेला रस्ता त्याचा दोष व दायित्व कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्याचे काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे . याविरोधात रिक्षसंघटनेच्या वतीने आवाज उठवला जात असतानाच कडवई ग्रामपंचायतिच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थानी याची दखल घेतली असून सदर रस्त्याचे काम करणारा ठेकेदार व संबंधित अधिकारी यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत व सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे असा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे .

आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय पाऊल उचलणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे .
सन २०२० साली ९० लाख रुपये खर्ची टाकून बनवण्यात आलेला कडवई तुरळ हा रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्याच महिन्यांत खराब होण्यास सुरुवात झाली . तसेच या रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसून यात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे बोलले जात आहे .याविरोधात रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने आवाज उठविण्यात आल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्याची दुरुस्ती करून संबंधित ठेकेदार व तात्कालीन अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले .
मात्र महिना उलटून गेल्यानंतरही यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सांगितले .यामुळे रिक्षसंघटनेच्या वतीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे .
नुकत्याच झालेल्या कडवई ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत हा मुद्दा उचलून धरण्यात आला . यावेळी सदर रस्त्याचे निकृष्ठ व अंदाजपत्रकाप्रमाणे न झालेल्या कामाबाबत ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले . ग्रामस्थानी सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची तसेच या कामात अनियमितता झाल्याने बांधकाम विभागाचे तात्कालीन अधिकारी व ठेकेदार याचेवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी केली व तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला .या ठरावाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता पूजा इंगवले याना देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले .
आपण सतत पाठपुरावा करत असून सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले . याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी सध्या कामांची गडबड असल्याचे सांगत लवकरच सदर रस्ता दुरुस्तीचे काम हे ठेकेदारांच्या अनामत रकमेतुन करण्यात यावे यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येईल असे सांगितले .रिक्षा संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा बांधकाम विभागास पत्र देऊन यावर ठोस कार्यवाही व्हावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे . यावेळी अध्यक्ष मिलिंद चव्हाण , सल्लागार लीलाधर पंडित तसेच सदस्य दिलीप जोयशी व महेंद्र चोपडे उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.