अमन कुट्टी ‘इचलकरंजी फेस्टिवल 2022’ किताबाचा मानकरी
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि. ६ सप्टेबर :गत 27 वर्षापासून इचलकरंजीच्या गणेशोत्सवाचा अविभाज्य अंग बनलेल्या इचलकरंजी फेस्टिवलचा सोमवारी दिमाखात शुभारंभ करण्यात आला. पिळदार शरीरयष्टी, विविध पोझ आणि विजेतेपदासाठी लागलेली चढाओढ अशा स्पर्धात्मक वातावरणात भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेने फेस्टिवलची सुरुवात झाली. विविध पाच गटात झालेल्या स्पर्धेत अमन कुट्टी हा यंदाचा ‘इचलकरंजी फेस्टिवल 2022’ किताबाचा मानकरी ठरला. तर गजानन आयवळे याने ‘बेस्ट पोझर’ व ‘अजय केत्रे’ याने मोस्ट इम्प्रुव्हड चा मान मिळविला.
दरम्यान, पुढील वर्षापासून शरीरसौष्ठव स्पर्धेसाठीच्या बक्षिसांमध्ये भरघोस वाढ करण्याची घोषणा फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी केली.
इचलकरंजीतील गणेशोत्सवातील सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्वापूर्ण अंग बनलेल्या व कला, क्रीडा, सांस्कृतिक गुणांचा परिचय करवून देणार्या इचलकरंजी फेस्टिवलच्या कार्यक्रमांना सोमवारपासून उत्साही वातावरणात सुरुवात झाली. फेस्टिवल अंतर्गत 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इचलकरंजी फेस्टिवलचे उद्घाटन फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि मान्यवरांचे हस्ते श्रीं चे पुजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, प्रकाश मोरे, प्रकाशराव सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत फेस्टिवलच्या संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांनी तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष अहमद मुजावर यांनी केले. सूत्रसंचालन सचिव प्रा. शेखर शहा यांनी केले.
आमदार प्रकाश आवाडे यांनी, कलाकार व खेळाडूंच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा आविष्कार प्रकट करणारे एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचे काम इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून होत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे फेस्टिवल हा लोकोत्सव बनला असून येणार्या काळात त्याला आणखीन चांगले स्वरुप देऊया. स्थानिक कलाकारांबरोबरच बाहेरील कलाकारांचे कार्यक्रम करुया आणि इचलकरंजीचे नांव सांस्कृतिक क्षेत्रातही उंचावत नेऊया, असे सांगितले.
सर्वच क्षेत्रातील कलाकार, खेळाडूंना आपली कला सादर करण्यासाठी फेस्टिवल एक चांगले व्यासपीठ असून त्याद्वारे त्यांनी जीवनात भरारी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि विकास अडसुळ, आदित्य आवाडे, अजिंक्य रेडेकर, राहुल घाट, तात्यासाहेब कुंभोजे, सचिन गोलंगडे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : 50 ते 55 किलो गट – तुषार कारंडे, आकाश कुराडे, चेतन शिंदे, उमर शिरगांवे, आकाश चव्हाण. 55 ते 60 किलो – गजानन आयवळे, मनिष चौधरी, मोईन रंगरेज, मोहन आदमाने, अक्षय चंदुरे. 60 ते 65 किलो – अजय केत्रे, वैभव चव्हाण, शुभम पाटील, संजीव जाधव, अक्षय माने. 65 ते 70 किलो – सैफुल पठाण, संकेत लठ्ठे, शाहिद रोडे, शाहरुख पठाण, मनोज आदगेकर. 70 किलोवरील गट – अमन कुट्टी, अमित पाटील, अक्षय सोनुले, द्वितेश धनवडे, अनिकेत सुतार. तर मेन्स् फिजिक – अभिनंदन कुंभार (प्रथम), चंद्रकांत पोटे (द्वितीय), आयान सनदी (तृतीय).
पंच म्हणून न्यू कोल्हापूर बॉडी बिल्डिंग असोशिएशनचे सेक्रेटरी राजेश वडाप, दीपक माने, संदीप यादव, सचिन कुलकर्णी, रविंद्र चौगुले, राजेंद्र हेंद्रे, मुरली वत्स, इनायत तेरदाळकर, नितीन माने आदींनी काम पाहिले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.