चिल्लर पार्टीने दिली पोषण आहारासाठी लागणारी भांडी
भैरी धनगरवाड्यावरील शाळेची मिटली कैफियत
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि. 29: कोल्हापूर जिल्ह्यातील भैरी धनगरवाड्यातील शाळेत रोजचा पोषण आहार शिजविण्यासाठी शिक्षकांनाच करावी लागणारी कसरत पाहून चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने या शाळेला दिलासा दिला. पोषण आहाराची भांडी, शेगडी, मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्लास आणि वॉटर बॉटल असे साहित्य मंगळवारी या शिक्षकांपर्यंत पोहचवून त्यांची कैफियत दूर केली. चिल्लर पार्टीचे सदस्य श्रीधर कुलकर्णी यांनी आपल्या मुलाच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून आहारासाठी लागणारी ही भांडी व सर्व साहित्य दिले आहे.
गेली दहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चिल्लर पार्टी गरिब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट विनामूल्य दाखविण्याची चळवळ निवृत्त कला शिक्षक मिलींद यादव करत आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगरी भागात असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चित्रपट दाखविण्यात येत आहेत. हे विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात शिक्षण घेतात, हे लक्षात आल्यानंतर श्री यादव यांनी आपल्या परीने वेगवेगळ्या माध्यमातून मदत देऊ केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भैरी धनगरवाडा हे करंजफेण जवळचे छोटेसे गाव. या गावातील शाळेत परिसरातील 20 ते 25 शालेय विद्यार्थी शिक्षण घेतात. रोजचा पोषण आहार शिजविण्यासाठी येथील शिक्षकांनाच कसरत करावी लागते. धनगरवाड्यातील या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी भांड्यांची कमतरता असल्याचे लक्षात येताच श्रीधर कुलकर्णी यांनी देऊ केलेले हे साहित्य चिल्लर पार्टीचे मिलींद यादव, चंद्रकांत तुदिगाल, यशोवर्धन आडनाईक यांच्यासह इतर सदस्यांनी धनगरवाड्यावर पोहोच केले. श्रीधर कुलकर्णी यांनी दाखविलेल्या या दातृत्वाबद्दल भैरी धनगरवाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य कानू शेळके (अध्यक्ष), मंगल शेळके (उपाध्यक्ष), बबन जानकर आणि शिक्षक अमोल माने यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी त्यांचे व चिल्लर पार्टीचे आभार मानले आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.