कोतवाल पदभरतीला तातडीने स्थगिती द्या, अन्यथा…
काँग्रेस नेते अनिरुद्ध कांबळे यांचा प्रशासनाला इशारा
रत्नागिरी: नियाझ खान
दि ,२ :रत्नागिरी जिल्हामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये कोतवाल भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. कोतवाल पदासाठी जिल्यातील अनेक उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या. त्यातील काही उमेदवारांनी आमच्यावर अन्याय झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्या-त्या गावातील वा सजातील इच्छुक उमेदवारांना अधिक – संधी मिळणे आवश्यक असून विद्यमान भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी व नव्याने भरती करताना स्थानिक उमेदवाराला संधी दयावी अशी मागणी रत्नागिरी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी कोतवाल भरती केली जात आहे. प्रशासनाकडून ही भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे. विविध संवर्गातील कोतवाल पदासाठी आरक्षण निश्चित करताना त्या-त्या गावातील वा सजातील लोकसंख्येच्या निकषाचा प्राधान्याने विचार झाल्याचे समजते. मात्र, त्या-त्या गावातील वा संवर्गातील आरक्षणानुसार उमेदवारी अर्ज मागविताना गावातील उमेदवारांसह संपूर्ण तालुक्यातील इच्छुक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही गावातील वा सजातील आरक्षणानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रीयेच्या माध्यमातून कोतवाल म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
असे असले तरी, संपूर्ण तालुक्यातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागणविण्याऐवजी गावातील वा सजातील इच्छुक उमेदवारांना गावामध्ये उमेदवारी अर्ज करण्यास प्राधान्य मिळाल्यास गावातील इच्छुक उमेदवारांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी प्राप्त होईल. त्यातच, गावातील वा सजातील स्थानिक उमेदवाराला संधी मिळाली तर स्थानिक पातळीवरील प्रशासकीय कामे गतिमान होऊ शकतील. या संदर्भात हिताचा विचार प्रशासनाने करावा. या भरती प्रक्रियेला तातडीने स्थगिती द्यावी अन्यथा जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.