मुंबई गोवा महामार्गावरील आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडाला झाली १११ वर्ष

आरवली:- सचिन पाटोले
ब्रिटीशांच्या काळात मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यावर आरवली येथे पूल उभारणीसाठी खोदकाम सुरू होते. त्यावेळी गड नदीपात्रालगत गरम पाण्याच्या साठ्याचा शोध लागला. या घटनेला २९ जानेवारी २०२२ रोजी १११ वर्षे पूर्ण झाली असून या वेळी करण्यात येणार्‍या चौपदरीकरणात ही कुंडे वाचविली असली तरी त्याला सुशोभिकरणाची गरज आहे.
ब्रिटीशांच्या काळात मुंबई-गोवा मार्गाचे काम हाती घेण्यात आले. या मार्गाचे काम आजच्यासारखी यंत्रणा त्या काळात नसल्याने आव्हानात्मकच होते. डोंगर खोदणे आणि पूल उभारणे ही कामे प्रथम हाती घ्यावी लागली. आरवलीजवळ काळ्या पाषाणात पूल उभारण्याचे काम हाती घेतले. त्या वेळी गडनदी पात्रालगत खोदकाम सुरू असताना गरम पाण्याच्या साठ्याचा शोध लागला. गंधकमिश्रीत या पाण्याचा उपयोग मुंबई-गोवा मार्गावरील प्रवाशांना व्हावा, या हेतूने या गरम पाण्याच्या साठ्याची स्त्री आणि पुरूषांसाठी दोन स्वतंत्र कुंडे बांधली गेली. या घटनेला आहे आता १११ वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने येथील ग्रामस्थांनी २९ जानेवारीला सकाळी या कुंडाचे मनोभावे पूजन केले. ब्रिटीशांच्या काळातील या ऐतिहासिक खूणा आजही जपल्या गेल्या असल्या तरी काहीशा दुर्लक्षित झाल्या असल्याचे येथील दुरवस्थेतून लक्षात येते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.